बापूंच्या निधनामुळे माझ्या कुटुंबातील व्यक्तीला गमावल्यासारखे मला भासते आहे. भारतीय क्रिकेटला त्यांच्यासारखा मौल्यवान हिरा कधीच सापडणार नाही, अशा शब्दांत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रमेशचंद्र ऊर्फ बापू नाडकर्णी यांना आदरांजली वाहिली.

भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू नाडकर्णी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत नाडकर्णी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावस्करांव्यतिरिक्त, दिलीप वेंगसरकर, रत्नाकर शेट्टी, मिलिंद रेगे आणि उमेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

बापूंची आठवण उलगडताना गावस्कर म्हणाले, ‘‘बापूंसारखा खडूस क्रिकेटपटू मी आजवर पाहिला नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत ‘छोडो मत’ याच धोरणाने ते खेळायचे. माझ्या कारकीर्दीत त्यांचे फार सहकार्य मला लाभले. खेळाडू म्हणून ते मैदानावर असताना सतत विविध बाजूंनी विचार करायचे.’’

त्याशिवाय वेंगसरकर यांनीही नाडकर्णी यांच्याबरोबरच्या काही आठवणींना उजाळा दिला. ‘‘ज्या वेळी मी कोलकाताला वेस्ट इंडिजविरुद्ध कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले. त्या वेळी नाडकर्णी भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. उपाहाराला ज्या वेळी मी ७० धावांवर खेळत होतो, तेव्हा त्यांनी मला शतक झळकावल्यानंतर घडय़ाळ बक्षीस म्हणून देण्याचे वचन दिले. मुख्य म्हणजे मी शतक साकारल्यानंतर त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले,’’ असे वेंगसरकर म्हणाले.

मुंबईचे माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे म्हणाले, ‘‘अजित वाडेकर, माधव आपटे यांच्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या अंतरात मुंबई क्रिकेटने आणखी एका ताऱ्याला गमावले. ते एक धाडसी क्रिकेटपटू होते. आजच्या पिढीतील कोणत्याही फलंदाज अथवा गोलंदाजाला त्यांच्यासारखे मुळीच खेळता येणार नाही.’’