News Flash

माजी सायकलपटू, प्रशिक्षक आणि संघटक कमलाकर झेंडे यांचे निधन

१२ जून १९५२ या दिवशी जन्मलेल्या झेंडे यांनी १९८०, १९८१ आणि १९८२ अशी सलग तीन वर्षे मुंबई-पुणे सायकल शर्यतीचे विजेतेपद पटकावले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई-पुणे या प्रतिष्ठेच्या सायकल शर्यतीवर वर्चस्व गाजवल्यामुळे ‘घाटांचा राजा’ असे बिरूद मिरवणारे माजी सायकलपटू, प्रशिक्षक आणि संघटक कमलाकर सोनबा झेंडे यांचे बुधवारी सकाळी पुणे येथील राहत्या घरी आजारपणामुळे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

१२ जून १९५२ या दिवशी जन्मलेल्या झेंडे यांनी १९८०, १९८१ आणि १९८२ अशी सलग तीन वर्षे मुंबई-पुणे सायकल शर्यतीचे विजेतेपद पटकावले. कारकीर्दीत एकूण पाच वेळा त्यांनी ही शर्यत जिंकण्याची किमया साधली. त्रिवेंद्रम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही झेंडे यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. घाटांसारख्या अवघड वाटेवरही योग्य रीतीने तसेच चपळाईने सायकल चालवण्यात झेंडे यांचा हातखंडा होता. याव्यतिरिक्त १९८१मध्ये झालेली अखिल भारतीय मुंबई-नाशिक ही राष्ट्रीय पातळवरील सायकल शर्यतही त्यांनी जिंकली होती.

निवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये १९९६पासून २००५पर्यंत ते सायकलिंग प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. पुणे जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्षपद आणि महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे उपाध्यक्षपदही झेंडे यांनी सांभाळले. त्याशिवाय चार वर्षांसाठी भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले. झेंडे यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने १९७६-७७ साली त्यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यानंतर २००२-०३मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. झेंडे यांच्या निधनामुळे सायकलिंग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमलाकर झेंडे यांनी महाराष्ट्रातील सायकलिंग क्षेत्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. मुंबई-पुणे सायकल शर्यतीच्या जेतेपदांसह त्यांनी ‘घाटांचा राजा’ हा किताबही अनेकदा जिंकला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे आयुष्यातील अखेरच्या क्षणी त्यांना नीट बोलताही येत नव्हते. त्यांच्या निधनामुळे मी अनेक वर्षांपासूनचा घनिष्ठ मित्र गमावला आहे.

– गजेंद्र गान्ला, मुंबई उपनगर सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:14 am

Web Title: former cyclist coach and organizer kamlakar zende passes away abn 97
Next Stories
1 एकदिवसीय क्रमवारीत आझमची कोहलीवर सरशी
2 यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारत दोन अंकी पदकसंख्या गाठेल!
3 गुजरातला नमवून महाराष्ट्र बाद फेरीत
Just Now!
X