इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक याचा मंगळवारी इंग्लंडमध्ये विशेष सन्मान करण्यात आला. कूक याला मंगळवारी ‘नाइटहुड’ देऊन सन्मानित करण्यात आले. तब्बल १२ वर्षानंतर एका खेळाडूला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याचा उल्लेख ‘सर’ अ‍ॅलेस्टर कूक असा करण्यात येणार आहे. हा सन्मान मिळणारा अ‍ॅलेस्टर कूक हा ११ वा खेळाडू ठरला आहे. बकिंघम पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात कूकचा सन्मान करण्यात आला.

३४ वर्षीय कूकने गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्ती स्वीकारली होती. ओव्हल कसोटीत कूकने शतकी खेळी करून क्रिकेटला रामराम ठोकला होता. कुकच्या नावे कसोटी कारकिर्दीत १२ हजार ४७२ धावा आहेत. त्याने इंग्लंडकडून सर्वाधिक ३३ शतके, सर्वाधिक १६१ सामने, सर्वाधिक १७५ झेल आणि सर्वाधिक कसोटी ५९ विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे.