लंडन : सहा फूट, सहा इंच उंचीचे वेगवान गोलंदाज आणि इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे बुधवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

विलिस यांनी वयाच्या २१व्या वर्षी १९७१च्या अ‍ॅशेस मालिकेत पदार्पण केले. अ‍ॅलन वॉर्डला दुखापत झाल्यामुळे विलिस यांना ही संधी चालून आली. मग ते मालिकेतील उर्वरित चारही सामने खेळले. इंग्लंडने सात सामन्यांची ती मालिका २-० अशी जिंकली होती. १९७१ ते १९८४ या कालावधीतील ९० कसोटी सामन्यांत ३२५ बळी मिळवले. १९८१च्या हेडिंग्ले येथील ऐतिहासिक कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर मात केली. त्या सामन्यात विलिस यांनी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ४३ धावांत ८ बळी मिळवले होते. सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या इंग्लिश गोलंदाजांमध्ये जिमी अँडरसन, इयान बोथम आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यानंतर विलिस यांचा चौथा क्रमांक लागतो. निवृत्तीनंतर विलिस यांनी ‘बीबीसीसी टीव्ही’ आणि ‘स्काय स्पोर्ट्स’ यांच्यासाठी क्रिकेट समालोचकाचे काम केले. त्यांनी ६४ एकदिवसीय सामन्यांत ८० बळी मिळवले.

विलिस यांनी सुरुवातीच्या व्यावसायिक कारकीर्दीत सरे संघाचे दोन वर्षे प्रतिनिधित्व केले. मग १२ वर्षे ते वॉर्विकशायरकडून खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी २४.९९च्या सरासरीने ३०८ सामन्यांत ८९९ बळी घेतले.

विलिस यांची कारकीर्द

प्रकार          सामने       बळी     सरासरी       सर्वोत्तम

कसोटी             ९०     ३२५            २५.२०       ८/४३

एकदिवसीय     ६४     ८०               २४.६०      ४/११