१९६६मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मार्टिन पीटर्स यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे शनिवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

इंग्लंडने जिंकलेल्या एकमेव विश्वचषकाचा अंतिम सामना वेम्बले येथे झाला. यात इंग्लंडने पश्चिम जर्मनीचा ४-२ असा पराभव केला. इंग्लंडकडून जेफ हर्स्ट यांनी हॅट्ट्रिक नोंदवली, तर चौथा गोल पीटर्स यांनी केला होता. त्यांनी १९७०च्या विश्वचषकातही इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय वेस्ट हॅम युनायटेड, टॉटेनहॅम हॉटस्पर, नॉरविच सिटी आणि शेफिल्ड युनायटेड या संघांकडून क्लब फुटबॉल खेळले. ‘दी कम्पलिट मिडफिल्डर’ (संपूर्ण मध्यरक्षक) म्हणून पीटर्स यांना फुटबॉल क्षेत्रात ओळखले जायचे.

१९६६ ते १९७४ या कालावधीत पीटर्स यांनी इंग्लंडकडून ६७ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना २० गोल नोंदवले, तर क्लब फुटबॉलमध्ये १९५९ ते १९८३ या कालखंडात ७२१ सामन्यांत १७४ गोल केले. त्यांनी प्रशिक्षकपदसुद्धा भूषवले आहे.