इंग्लंडचा दिग्गज माजी फिरकीपटू माँटी पानेसारने भारतीय फिरकीपटूंच्या बाबतीत एक प्रतिक्रिया दिली आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात यजुर्वेंद्र चहल आणि कुलदीप यादवऐवजी अश्विन-जडेजा किंवा हरभजन सिंग यांची निवड केली गेली पाहिजे, असेही पानेसरने सांगितले.

रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाची जोडी अधिक प्रभावी ठरेल, कारण त्यांच्याकडे अधिक अनुभव आहे, असे मत पानेसारने दिले आहे. तो म्हणाला, ”फिरकीपटूंची निवड ही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. जर जडेजा आणि अश्विन संघात पुनरागमन करणार असतील, तर काहीच अडचण नाही. मी विराट कोहली असतो, तर मी कुलदीप-चहलऐवजी अश्विन आणि जडेजाची निवड केली असती. कारण या गोलंदाजांकडे सामना जिंकवून देण्याची क्षमता आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये अष्टपैलू क्रिकेटपटूंचीही क्षमता आहे. हे दोन्ही खेळाडू मोठे मॅच विजेते आहेत.”

हरभजनही वर्ल्डकपसाठी दावेदार – पानेसार

पानेसार म्हणाला, ”यंदाची आयपीएल स्पर्धा ही भारतीय फिरकीपटूंबद्दल आहे. आपण हरभजन सिंगलाही बाजुला करू शकत नाही. हरभजन सिंगचा आयपीएल हंगाम चांगला गेला, तर त्याची वर्ल्डकप संघात निवड का होऊ नये? माझ्या मते, त्याच्यात अजूनही थोडे क्रिकेट शिल्लक आहे. अश्विन, जडेजा आणि हरभजन सिंग यांनाही विश्वचषक संघात स्थान मिळविण्याची संधी आहे. फक्त या खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने तब्बल 699 दिवसानंतर पहिला क्रिकेट सामना खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला कोलकाताने संधी दिली. 40 वर्षीय हरभजनने 161 आयपीएल सामन्यात 150 बळी घेतले आहेत. यापूर्वी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.