पुणे : १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वशर्यतीत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारे कर्नल गुलाम मोहम्मद खान (निवृत्त) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले.

७४ वर्षीय खान हे १९७३मध्ये भारतीय सैन्यदलाच्या अकादमीत दाखल झाले होते. त्यानंतर अश्वरोहणात अप्रतिम कामगिरी करत त्यांनी सर्वाची मने जिंकली. १९८० ते ९० च्या दशकात ते एएससी संघाचे कर्णधार होते. या कालावधीत त्यांनी संघाला सहा राष्ट्रीय जेतेपदे मिळवून दिली. तसेच वैयक्तिक इव्हेंटिंग प्रकारात चार वेळा राष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले.

१९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी इव्हेंटिंगमध्ये भारताला सांघिक सुवर्णपदक तसेच वैयक्तिक रौप्यपदक जिंकून दिले. पुढील स्योल येथील आशियाई स्पर्धेत त्यांनी सांघिक कांस्यपदकाची कमाई केली.