आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे (फिफा) माजी उपाध्यक्ष युगेनियो फिगरेडो यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीसाठी स्वित्र्झलड पोलिसांनी उरुग्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. दक्षिण अमेरिकन महासंघाचे माजी अध्यक्ष असलेले फिगरेडो गुरुवारी पहाटे मायदेशात आरोपांच्या चौकशीसाठी दाखल झाले. त्यांना थेट न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याच़े, न्यायलयाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र न्यायाधीश अ‍ॅड्रियन डी लोस सँटोस यांनी फिगरेडोच्या वकिलांच्या विनंतीला मान देत नजरकैदेला परवानगी दिली, असेही सूत्रांकडून समजते.
भ्रष्टाचार प्रकरणी दोषी आढळल्यास फिगरेडोंना २ ते १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. मे महिन्यात स्वित्र्झलड पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटककरण्यात आलेल्या फिफाच्या सात अधिकाऱ्यांमध्ये ८३ वर्षीय फिगरेडो यांचाही समोवश होता. तसेच अमेरिकन पोलीस यंत्रणाही लाचखोरीच्या चौकशीसाठी फिगरेडो यांचा ताबा मिळवू इच्छित आहे. अशा प्रकारची विनंती उरुग्वेनेही केली होती. स्वित्र्झलडच्या न्यायमंत्रालयाने या दोन्ही देशांना फिगरेडो यांना स्वाधीन करण्याची परवानगी दिली आहे.