भारताचे सर्वात वयस्कर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं आज (शनिवार) सकाळी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. १९४० च्या दशकात ते एकूण ९ रणजी सामने खेळले होते. तसंच त्यांनी ९ रणजी सामन्यांमध्ये एकूण २७७ धावा केल्या. रायजी हे मुबंईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोद्याविरोधात आपला पहिला सामना खेळले होते. तसंच १९४१ च्या बॉम्बे पेन्टॅग्युलरच्या हिंदुज या संघाचे अतिरिक्त खेळाडू होते.

किक्रेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लेखन केलं. व्यवसायानं ते चार्टर्ड अकाऊंटंट होते. २०१६ मध्ये बी.के.गुरूदाचार यांचं निधन झालं. त्यानंतर रायजी हे देशातील सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ठरले. यावर्षी २६ जानेवारी रोजी रायजी यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टिव्ह वॉ हेदेखील हजर होते.

७ मार्च रोजी जॉन मॅनर्स यांच्या निधनानंतर रायजी हे जगातील सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी किक्रेटपटू ठरले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयनंदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ” स्टिव्ह वॉ आणि मी रायजी यांच्याकडून क्रिकेटमधील काही सुंदर किस्से ऐकले होते. आमच्या लाडक्या खेळाविषयीच्या आठवणींचा खजिना दिल्याबद्दल धन्यवाद,” अशा शब्दात त्यांनी रायजी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.