आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. मणी यांना ३ वर्षांसाठी या पदावर नियुक्त केले असून मंगळवारी (४ सप्टेंबर) याबाबतची अधिकृत माहिती पीसीबीच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे.

मणी यांनी लगेचच पदभार स्वीकारला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संचालक मंडळाने ही निवड केली आहे. आतापर्यंत या पदावर नजाम सेठी विराजमान होते. २१ ऑगस्टला त्यांनी आपला पदभार सोडला. राजीनामा देताना त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

पेशाने लेखापरीक्षक (सीए) असलेल्या मणी यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना या पदी नियुक्त करण्यात आले आहे. १९८९ ते १९९६ या काळात त्यांनी पाकिस्तानचे ‘आयसीसी’त प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००३ साली त्यांची ICCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.