भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्याच्या घडीला पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्र्यांची भूमिका निभावणाऱ्या लक्ष्मी रतन शुक्लाने करोनाविरुद्ध लढ्यात आदर्शवत पाऊल उचललेलं आहे. लक्ष्मी रतन शुक्लाने आपल्या ३ महिन्यांचा पगार आणि बीसीसीआयकडून मिळणारं पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेलं आहे. १९९९ साली शुक्ला यांनी भारतीय संघाचं ३ वन-डे सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं होतं. याव्यतिरीक्त २०१२ साली आयपीएलविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे ते सदस्य होते. २०१५ साली लक्ष्मी रतन शुक्लाने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.

अवश्य वाचा – पहिले देश महत्वाचा; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर IPL चा विचार करु !

“प्रत्येकाने आपापल्यापरीने करोनाविरुद्ध लढ्यात मदत करावी, सध्याच्या घडीला ही काळाची गरज बनलेली आहे. आमदार म्हणून माझा ३ महिन्यांचा पगार आणि बीसीसीआयकडून मिळणारं पेन्शन मी मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं आहे.” शुक्ला यांनी पीटीआयला माहिती दिली. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर शुक्ला यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात ते विजयी झाले. सध्या त्यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा पदभार आहे.

अवश्य वाचा – देशासाठी मैदान मारणारा अजय ठाकूर करोनाविरुद्ध लढ्यात उतरला मैदानावर

१९९९ सालात भारतीय संघाकडून ३ वन-डे सामने खेळल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा संधी मिळाली नाही. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी बंगालचं प्रतिनिधीत्व करणं सुरु ठेवलं. २०११-१२ साली बीसीसीआयच्या मानाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेत बंगालने अंतिम फेरीत बलाढ्य मुंबईवर मात केली होती. शुक्लाने या सामन्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद या संघाचंही शुक्ला यांनी प्रतिनिधीत्व केलं आहे.

अवश्य वाचा – ‘गोल्डन गर्ल’ हिमा दासकडून एका महिन्याचा पगार करोना मदतनिधीसाठी