भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रोहित शर्माला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्मा मैदानावर उतरताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. रोहित शर्माच्या आयपीएलमधील सहभागावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगरसरकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दिलीप वेंगरसकर चिफ सिलेक्टरदेखील राहिले आहेत. देशाचं प्रतिनधित्व करण्यापेक्षा आयपीएल खेळणं जास्त महत्वाचं आहे का अशी विचारणा त्यांनी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“भारतीय संघासाठी खेळण्यापेक्षा आयपीएल खेळणं जास्त महत्वाचं आहे का हा प्रश्न आहे. देशासाठी खेळण्यापेक्षा क्लब जास्त महत्वाचा आहे का ? बीसीसीआय यासंबंधी काही निर्णय घेणार आहे का ? की रोहितच्या दुखापतीचे योग्य निदान करण्यात बीसीसीआयच्या फिजिओने चूक केली आहे?,” अशी प्रश्नांची मालिकाच दिलीप वेंगसरकर यांनी मांडली आहे.

मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३३ वर्षीय रोहितला ‘आयपीएल’मधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत डाव्या पायाला दुखापत झाली. पण रोहित शर्माने मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीसाठी मुंबई इंडियन्सच्या संघात पुनरागमन केलं. परंतु पायाच्या दुखापतीतून तो १०० टक्के सावरला आहे की नाही, तसेच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड करण्याबाबत ‘बीसीसीआय’ कोणता पावित्रा अवलंबणार, हे लवकरच समजेल.

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितला जोखीम न पत्करता अधिक काळ विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. पंजाबविरुद्धच्या लढतीनंतर रोहितला चार सामन्यांना मुकावे लागले. संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच रोहित हैदराबादविरुद्ध खेळेल, असे भाकीत वर्तवले होते. नाणेफेकीच्या वेळी तू पूर्णपणे तंदुरुस्त आहेस का, असे विचारले असता रोहितने होकारार्थी उत्तर देत, आपण सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले.

भारतीय संघ याच महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. सीरिजमध्ये तीन एकदिवसीय सामने, तीन टी-२० सामने आणि चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत.