क्रिकेटर मोहम्मद शमीच्या बाजूने आता दोन महत्त्वपूर्ण व्यक्तींनी आपली मतं दिली आहेत. यातली एक व्यक्ती म्हणजे, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर दुसरी व्यक्ती ही शमीचे सासरे मोहम्मद हसन आहेत. धोनीने शमीचे समर्थन करत म्हटले की, ‘शमी हा एक चांगला माणूस आहे. पैशांसाठी पत्नीला आणि देशाला धोका देणारा तो माणूस नाही.’ तसेच धोनीने यावर अधिक काही बोलण्यास नापसंती दर्शवली. धोनी म्हणाला की, ‘या सर्व गोष्टी शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असल्यामुळे मी यात अजून काही बोलू शकत नाही.’ धोनीची ही प्रतिक्रिया एका क्रिकेट वेबसाइटने वृत्तपत्राचा संदर्भ देत प्रसिद्ध केली.

शमीचे समर्थन करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे त्याचे सासरे मोहम्मद हसन. मोहम्मद यांनी एबीपी न्युजशी बोलताना म्हटले की, ‘हसनी आणि शमीतील भांडणाची कारणं कुटुंबातील इतर व्यक्तींना माहीत नाहीत. प्रसारमाध्यमांमार्फतच आम्हाला या साऱ्या गोष्टी कळल्या.’ पुढे हसन म्हणाले की, ‘शमी फार चांगला माणूस आहे. तो फार कमी बोलतो यात काहीच वाद नाही. त्या भगवंतालाच माहित काय खरं आहे आणि काय खोटं. हसीनला आयुष्यात जे जे हवे होते ते मिळवण्यासाठी तिने नेहमीच संघर्ष केला. आपल्या ध्येयापासून ती कधीच मागे हटली नाही.’ आयपीएलचे सामन्यांना लवकरच सुरूवात होणार आहे. शमी दिल्ली डेअरडेविल्स टीमकडून खेळणार आहे. शमीने हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. मुलीसाठी जे योग्य आहे ते सर्व करण्याची तयारी शमीने दाखवली आहे.