इंग्लंड दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सध्या भारतीय संघाला आपल्या चाहत्यांच्या टीकेचा रोष सहन करावा लागत आहे. याचसोबत अनेक माजी खेळाडूंनीही भारतीय संघाच्या निवडीबद्दल टीका केली होती. यापाठोपाठ भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील यांनीही विराट कोहली – रवी शास्त्री जोडीवर बोचरी टीका केली आहे.

इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत इंग्लंडमधील कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता कोहलीने, “चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्येच खेळवली गेली होती हे काही लोकं सोयिस्करपणे विसरत आहेत. इंग्लंडमध्ये पोहचल्यावर मी काय करेन असं मला विचारण्यात आलं होतं. यावर मला रस्त्यात कॉफीचा कप घेऊन फिरायला आवडेलं असं उत्तर दिलं. माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे”, असं उत्तर दिलं होतं.

विराट याचं हे वक्तव्य पाटील यांच्या चांगलचं जिव्हारी लागल्याचं दिसतंय. “इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्याआधी विराट आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन, इंग्लंडमध्ये वातावरणाशी जुळवून घ्यायला आम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे असं वक्तव्य केलं होतं. मात्र पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ फक्त कॉफी पिण्यातच मश्गूल असल्याचं दिसंतयं.” कसोटी मालिकेआधी केवळ एक सराव सामना खेळवण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावरही पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्यामुळे भारतीय संघावर होणाऱ्या टीकेचा भडीमार पाहता तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.