भारताच्या मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने, गेल्या काही दिवसांमध्ये आक्रमक खेळी करत संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रवीडनेही हार्दिक पांड्याच्या खेळीचं कौतुक केलं आहे. परिस्थितीप्रमाणे आपल्या खेळात बदल करत हार्दिक पांड्याने आपल्या खेळात सुधारणा केल्याचं द्रवीडने म्हणलं आहे.

अवश्य वाचा – हार्दिक ‘हे’ स्वप्न लवकरच पूर्ण करेल, वडिलांनी व्यक्त केला विश्वास

हार्दिकच्या खेळाबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. परिस्थिती चांगली असो अथवा वाईट, तो परिस्थितीशी जुळवून घेत आपली फलंदाजी करतो, आणि याचं संपूर्ण श्रेय हे पांड्याच्या खेळीलाच जातं. न्यूझीलंड ‘अ’ संघावर विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रवीड बोलत होता. सध्या न्यूझीलंड अ संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. राहुल द्रवीड भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे. हार्दिक पांड्या भारत ‘अ’ संघाकडून खेळताना द्रवीडने पांड्याला प्रशिक्षण दिलं आहे.

अवश्य वाचा – षटकार माझा बालपणीचा छंद, आताचे शास्त्र!

चॅम्पियन्स करंडकातील पाकिस्तानविरुद्ध केलेल्या स्फोटक खेळीनंतर हार्दिक पांड्या उजेडात आला. यानंतर कसोटी असो किंवा वन-डे त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही मधल्या फळीत खेळताना पांड्याने मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी केली. राहुल द्रविडच्या मते हार्दिक पांड्या हा आताच्या घडीला प्रत्येक फलंदाजाने परिस्थितीनुरुप कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण आहे.