भारतीय संघाचा माजी आक्रमक फलंदाज विरेंद्र सेहवागने आज वयाच्या चाळीशीत पदार्पण केलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या मनात आपल्या आक्रमक फलंदाजीने धडकी भरवणारा फलंदाज अशी ओळख सेहवागने निर्माण केली होती. आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज ही जबाबदारी विरुने आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. आपल्या कारकिर्दीत विरेंद्र सेहवागने अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर अनेक दिग्गज खेळाडूंनी केलेले विक्रम मोडलेही. आज वाढदिवसानिमीत्त सोशल मीडियावर सर्व स्तरातून सेहवागवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागच्या नावावर अशाच एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये षटकाराच्या सहाय्याने त्रिशतक झळकावणारा विरेंद्र सेहवाग पहिला खेळाडू ठरला आहे. 2004 साली मुलतान कसोटीत पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना साकलेन मुस्ताकच्या गोलंदाजीवर विरुने षटकार ठोकत त्रिशतक साजरं केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.