क्रीडा प्रतिनिधी : परदेशात कसोटी मालिकांमध्ये विजय, हा जसा आता भारतीय क्रिकेट संघासाठी आव्हानात्मक असतो, तसाच तो १९७०च्या दशकातही होता. त्या काळात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दोनदा इंग्लंडला आणि एकदा वेस्ट इंडिजला नमवण्याची किमया साधल्यामुळे अव्वल कसोटी संघ म्हणून भारतीय संघ नावारूपास आला. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकूण १६ कसोटी सामन्यांत खेळला. यापैकी चार सामने भारत जिंकला आणि चार सामने गमावले. याचप्रमाणे आठ सामने अनिर्णीत राखले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार कसोटी मालिका खेळला, यापैकी तीन मालिका भारताने जिंकल्या. त्यामुळेच एक यशस्वी कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेट इतिहासात त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. १९७४मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करला. भारताच्या या कामगिरीवर जोरदार टीका झाल्यानंतर वाडेकर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.

१९७०-७१ : भारताचा वेस्ट इंडिज दौरा
भारताचा १-० मालिका विजय

निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघनिवड करताना खराब फॉर्म आणि तंदुरुस्ती या कारणास्तव कर्णधार मन्सूर अली खान पतौडी आणि चंदू बोर्डे यांना वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नेतृत्वाची धुरा अजित वाडेकर यांच्याकडे सोपवण्यात आली. वेंकटराघवन त्यावेळी उपकर्णधार होते. कॅरेबियन दौऱ्यावरील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० असा ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजमध्ये भारताने प्रथमच कसोटी सामना आणि मालिका जिंकण्याची किमया साधली होती. सुनील गावस्कर यांनी याच मालिकेत कसोटी पदार्पण करताना आपली छाप पाडली.

एक द्विशतक आणि तीन शतकांसह त्याने एकंदर ७७४ धावा काढल्या.

१९७१ : भारताचा इंग्लंड दौरा
भारताचा १-० मालिका विजय

कॅरेबियन दौऱ्यावरील विजयामुळे वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. दिलीप सरदेसाई, श्रीनिवास वेंकटराघवन, गुंडप्पा विश्वनाथ, बिशनसिंग बेदी आणि युवा गावस्कर यांचा भारतीय संघात समावेश होता. लँकेशायर कौंटी संघाशी करारबद्ध झालेले फारुख इंजिनीयरसुद्धा भारतीय संघात होते. या दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० असा आश्चर्यकारक विजय मिळवण्याची किमया साधली. इंग्लंड दौऱ्यावर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे कर्तृत्व यावेळी दाखवले. लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथील पहिले दोन कसोटी सामने अनिर्णीत राखल्यानंतर द ओव्हलच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात ७१ धावांनी पिछाडीवर होता, मात्र तरीही तिसऱ्या कसोटीत चार विकेट राखून ऐतिहासिक विजय मिळवला. भागवत चंद्रशेखरच्या फिरकीमुळे (३८ धावांत ६ बळी) भारताने इंग्लंडचा दुसरा डाव १०१ धावांत गुंडाळला. मग भारताच्या दुसऱ्या डावात वाडेकर यांनी ४५ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.

१९७२-७३ : इंग्लंडचा भारत दौरा
भारताचा २-१ मालिका विजय

वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील आणखी एका गौरवशाली अध्यायाचे श्रेय लेग-स्पिनर भागवत चंद्रशेखरच्या फिरकीला द्यावे लागेल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने शानदार सुरुवात करताना दिल्लीची पहिली कसोटी सहा विकेट राखून जिंकली. याच कसोटीत चंद्रशेखरने ७९ धावांत ८ बळी घेत इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. मात्र पुढील दोन कसोटी सामन्यांत त्याच्या फिरकीपुढे इंग्लिश संघाने हाराकिरी पत्करली. दुसरी आणि तिसरी कसोटी जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली आणि उर्वरित दोन्ही सामने अनिर्णीत राखले. चंद्रशेखरने या मालिकेतील पाच सामन्यांत ३५ बळी घेतले होते. वाडेकर यांनी या मालिकेत एकूण ३१२ धावा काढल्या होत्या.

१९७४ : भारताचा इंग्लंड दौरा
इंग्लंडचा ३-० मालिका विजय

भारताने इंग्लंडला त्यांच्या देशात आणि मग मायदेशात पराभूत केल्यामुळे वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आत्मविश्वासाने इंग्लिश दौऱ्यावर गेला. इंग्लंडच्या फलंदाजांवरही विलक्षण दडपण होते. चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांच्यासारखे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज तसेच गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ आणि वाडेकर, फारुख इंजिनीयर यांच्यासारखे दर्जेदार फलंदाज संघात होते. भारतासाठी हा दौरा अतिशय वाईट ठरला. कारण तीन कसोटी सामन्यांमध्ये ०-३ सपाटून मार खाल्ल्यानंतर दोन एकदिवसीय सामनेसुद्धा भारताने गमावले. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताला पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा मान मिळाला होता.

लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ ४२ धावांत कोसळला होता. त्यामुळे ‘समर ऑफ ४२’ असा भारताच्या त्या दौऱ्यावर शिक्का मारला गेला. कारण १९७२मध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकणारा ‘समर ऑफ ४२’ आणि १९७३मध्ये ‘क्लास ऑफ ४४’ हे चित्रपट त्यावेळी चर्चेत होते. भारताच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेऊन वाडेकर यांनी या दौऱ्यावरून परतल्यानंतर निवृत्ती पत्करली.