भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अध्यपदी असणाऱ्या सौरव गांगुली याने कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या कर्णधारपदासाठी काही खेळाडूंना पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामासाठी गांगुलीने रॉबिन उथप्पाच्या नावाला प्राधान्य दिल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून रॉबिन उथप्पा ‘केकेआर’च्या संघातून खेळत असून, यंदाच्या हंगामात त्याला कर्णधारपदाची अपेक्षा असल्याचं वृत्त ‘स्पोर्ट्स कीडा’ने प्रसिद्ध केलं आहे.

उथप्पाव्यतिरिक्त गांगुलीने दिनेश कार्तिकच्या नावालाही प्राधान्य दिलं आहे. या शर्यतीत ऑस्ट्रेलियन खेळाडू ख्रिस लिनचाही नावाचा समावेश होता. पण, गांगुलीच्या मते लिनच्या सध्याच्या दुखापती पाहता संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवणं फायद्याचं ठरणार नाही. दरम्यान, ख्रिसच्या खांद्याला दुखापत झालेली असतानाही पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने एका संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. एकिकडे दुखापतग्रस्त ख्रिस आणि दुसरीकडे कर्णधारपदासाठी उत्सुक असणारा रॉबिन उथप्पा या दोन्ही खेळाडूंकडे पाहता आता ‘केकेआर’ची धुरा कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘केकेआर’च्या कर्णधारपदासाठी उथप्पा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

वाचा : २०१९ विश्वचषकानंतर निवृत्तीचा निर्णय घेईन – युवराज सिंह

काही दिवसांपूर्वीच ‘स्पोर्ट्स स्टार’शी संवाद साधतानासुद्धा तो कर्णधारपदाच्या प्रतिक्षेत असल्याचं स्पष्ट झालं. ‘त्या (कर्णधार) पदासाठी निवड झाली तर ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. पण, त्याबाबतचा निर्णय येण्यात काहीसा वेळ दवडला जाऊ शकतो. त्यांनी (निर्णायक मंडळात असणाऱ्यांनी) माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली तर त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन’, असं तो म्हणाला होता. तेव्हा आता यंदाच्या आयपीएल हंगामासाठी ‘केकेआर’चं नेतृत्व कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.