ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडविषयी धक्कादायक वक्तव्य केले आहे. द्रविडने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या ‘बुद्धीचा’ वापर करून एक मजबूत स्थानिक साचा तयार केला, ज्यातून राष्ट्रीय संघासाठी चांगले खेळाडू तयार होत आहेत. युवा खेळाडूंची गुणवत्ता हेरण्यामध्ये भारत आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे, असे चॅपेल यांनी म्हटले.

ग्रेग चॅपेल यांनी ‘क्रिकेट.कॉम.एयू’ला मुलाखत दिली. ते म्हणाले, ”भारताने यश संपादन केले आणि हे घडले कारण राहुल द्रविडने आमच्याकडून शिकले. त्याने स्थानिक क्रिकेट बळकट केले. आम्ही काय करीत आहोत, ते त्याने पाहिले. हीच प्रक्रिया त्याने भारतात राबवली आणि त्याच्याकडे खूप पर्याय होते. ऐतिहासिकदृष्ट्या आम्ही तरुण खेळाडू तयार करण्यात उत्कृष्ट ठरलो. परंतु मला वाटते, की गेल्या काही वर्षांत त्यात बदल झाला आहे. मी अनेक युवा खेळाडूंचा गट पाहिला आहे, ज्यांच्याकडे कौशल्य खूप आहे. पण त्यांना संधी मिळत नाहीत आणि हे मान्य नाही.”

 

या वर्षाच्या सुरूवातीला भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरले. विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील संघाने ऑस्ट्रेलियावर पलटवार केला. भारतीय संघात अनेक नवे खेळाडू होते, मात्र त्यांनी मालिकेत दमदार कामगिरी केली. अनेक क्रीडापंडितांनी भारताच्या या संघाला ‘ब’ संघ म्हटले.

याविषयी चॅपेल म्हणाले, “जर आपण ब्रिस्बेन कसोटीत खेळणार्‍या भारतीय संघाकडे पाहिले, तर त्यात तीन-चार नवीन खेळाडू होते आणि सर्वांनी सांगितले की ही भारताचा दुसरा संघ आहे. या खेळाडूंनी भारत ‘अ’ साठी बरेच सामने खेळले. भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या परिस्थितीत या खेळाडूंनी सामने खेळले. म्हणून जेव्हा त्याची निवड झाली, तेव्हा ते नवखे नव्हते, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.”