भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर आज शिवाजी पार्क येखील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाडेकर यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. शिवाजी पार्क स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत वाडेकरांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलिसांकडून वाडेकरांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.

 

शिवाजी पार्क स्मशानभूमीवर जमलेली गर्दी

 

आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांची ओळख होती. भारतीय क्रिकेटच्या प्रतिभावान कर्णधाराला अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये क्रिडाप्रेमी, माजी खेळाडू आणि राजकारणातल्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, निलेश कुलकर्णी, पॅडी शिवलकर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी वाडेकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

 

अजित वाडेकरांविषयी आपल्या आठवणी जागवताना सचिन तेंडुलकर