जगभरात थैमान घालत असलेलल्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्याही घरात करोनाचा शिरकाव झाला आहे. गौतम गंभीरच्या घरातील सदस्य करोना पॉझिटिव्ह असल्याचे गंभीरने ट्विट करून सांगितले आहे. तसेच, सध्या तो विलगीकरणात असून त्याने करोना चाचणी करून घेतली आहे असे ट्विट त्याने केले आहे.

“घरातील एका सदस्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मीदेखील कोविड टेस्ट केली आहे. करोना चाचणीच्या अहवालाची मी वाट पाहतो आहे. मी सध्या स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी करोना संदर्भातील नियम पाळा. कृपया करोनाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका. सुरक्षित राहा”, असं ट्विट गौतम गंभीरने केलं आहे.

भारताने गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीत २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ चा वन डे विश्वचषक जिंकला. या दोन्ही सामन्यात गंभीरने धडाकेबाज खेळी करून संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्याने अनुक्रमे ७५ आणि ९७ धावांचा धमाका केला होता. गंभीरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५८ कसोटी सामन्यात ४१.९५ च्या सरासरीने ४,१५४ धावा केल्या आहेत. तर १४७ वन डे सामन्यात ५,२३८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गंभीरने ३७ टी २० सामने भारताकडून खेळताना २७.४१ च्या सरासरीने ९३२ धावा केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर सध्या गंभीर राजकारणात आपला ठसा उमटवत आहे.