भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणला करोनाची लागण झाली आहे. इरफानने स्वत: सोमवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. इरफानच्या अगोदर एस. बद्रीनाथ, सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व खेळाडू छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा विजेता संघ इंडिया लेजेंड्सचा भाग होते.

इरफानने ट्वीट केले की, “कोणतीही लक्षणे नसताना मी करोना चाचणीत पॉझिटिव्ह आलो आहे. मी मी स्वत: ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.”

 

इरफानपूर्वी, बद्रीनाथ, युसूफ पठाण, आणि सचिन तेंडुलकर यांनीही आपल्या ट्विटमधून करोनाच्या संसर्गाची माहिती दिली. बद्रीनाथ म्हणाला, ”माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. मी करोनासंबधित नियमांचे पालन करत असून घरी क्वारंटाइन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.”

युसूफ पठाण पॉझिटिव्ह

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याचे शनिवारी रात्री समोर आले. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरला करोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.

सचिनही होम क्वारंटाइनमध्ये…

सचिनने करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विट करून माहिती दिली होती. तसेच आपण होम क्वारंटाइनमध्ये असल्याचेही सांगितले होते. “करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असे सचिन म्हणाला होता.