माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं होतं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केली होती. यावर अनुष्का शर्मानेही यावरुन नाराजी व्यक्त केली. दरम्यान आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचं गावसकर यांनी सांगितलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

गावसकर यांनी लोकांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असून, ते वेगळ्या पद्धतीनं समोर आणण्यात आलं असं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “जेव्हा कधी विराट कोहली शतक ठोकतो तेव्हा कोणीही अनुष्काला त्यासाठी क्रेडिट देत नाही. जेव्हा कधी हा मुद्दा येतो तेव्हा त्यावर भाष्य करणारे आपण पहिले व्यक्ती असतो”. पुढे त्यांनी सांगितलं की, “दौऱ्यावर असताना प्रेयसी किंवा पत्नीला सोबत नेण्याची परवानगी दिली जावी यासाठी मी नेहमीच समर्थन दिलं आहे. कारण क्रिकेट हे इतरांप्रमाणे आमच्यासाठीही एक उपजिवेकेचं साधन आहे”.

गावसकरांनी यावेळी आपले शब्द कशा पद्धतीने फिरवण्यात आले याबद्दल सांगितलं. “लॉकडाउन दरम्यान खेळाडू योग्य प्रकारे सराव करु शकले नाहीत असं आपल्याला सांगायचं होतं. त्यासाठी आपण विराट आणि अनुष्काचा सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळताना व्हायरल झालेल्या व्हिडीओचा दाखल दिला”.

“Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का…” ‘त्या’ वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही समालोचन ऐकलंत तर आकाश आणि मी हिंदी चॅनेलसाठी समालोचन करत होतो. यावेली आकाश खेळाडूंना सराव करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला याबद्दल सांगत होता. पहिल्या सामन्यात अनेक खेळाडूंच्या कामगिरीमधून ते दिसत होतं. रोहित पहिल्या सामन्यात चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवू शकत नव्हता. धोनी, विराटही फलंदाजी करताना अडखळत होते. अनेक फलंदाजांना सराव करण्याची संधीच मिळाली नाही”.

“नेमका हाच मुद्दा मांडण्यात आला होता. विराटलाही सराव करण्याची संधी मिळाली नव्हती. इमारतीच्या आवारात अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव करताना तो दिसला. तेच तर मी म्हणालो…फक्त तेवढीच गोलंदाजी…त्याशिवाय एकही शब्द मी काढला नाही. अनुष्का विराटला गोलंदाजी करत होती बास इतकंच. यामध्ये मी तिला जबाबदार कुठे ठरवलं? यात भेदभाव करण्याचा प्रश्न कुठे येतो ? जे मी व्हिडीओत पाहिलं तेच फक्त सांगितलं,” असं सांगत गावसकरांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.

अर्थाचा अनर्थ: विराट-अनुष्कावरून गावसकरांवर नेटकऱ्यांचा टीकेचा भडिमार, नक्की काय म्हणाले गावसकर

“मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की, मी अनुष्काला जबाबदार ठरवत नाही. ते इमारतीच्या आवारात टेनिस बॉलने खेळत होते. लॉकडाउनमध्ये वेळ घालवण्यासाठी हा मजेशीर खेळ आहे. यामध्ये मी विराटच्या अपयशासाठी अनुष्काला जबाबदार ठरवण्याचा प्रश्नच कुठे येतो ?,” अशी विचारणा गावसकरांनी केली आहे.

“तुम्ही मला ओळखता….दौऱ्यात पत्नीला सोबत नेलं पाहिजे यासाठी मी नेहमी समर्थन केलं आहे. मी एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आहे जो ९ ते ५ काम करतो आणि नंतर घरी आपल्या पत्नीकडे जातो. त्याचप्रमाणे क्रिकेटर्स जेव्हा दौऱ्यावर जातात किंवा घरच्या मैदानावर खेळत असतात तेव्हा ते पत्नीला सोबत का ठेवू शकत नाहीत? कामाचे तास संपल्यानंतर इतर सामन्य नागरिकाप्रमाणे त्यांनाही पत्नीकडे जायचं असतं. त्यामुळे मी अनुष्काला जबाबदार ठरवत नाही,” असं सुनील गावसकर यांनी स्पष्ट केलं आहे.