माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पंजाब वि. बंगळुरू सामन्यात समालोचन करताना विराटवर टीका केली आणि त्यातच अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर काहींनी टीका केली. इतकंच नव्हे तर खुद्द अनुष्कानेदेखील गावसकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

अनुष्काबद्दलच्या या वादानंतर सुनील गावसकर यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटपटू रोहन गावसकर याने एक सूचक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला. या फोटोतील चॉकलेट या शब्दाचं स्पेलिंग मुद्दाम चुकलेलं आहे, पण सवयीचा शब्द असल्याने अनेक जण तो शब्द चुकलेला असूनही बरोबरच वाचतात. याच मानवी प्रवृत्तीवर रोहनने बोट ठेवलं आहे. अनेकदा लोक सवयीचा भाग असल्याप्रमाणे पटकन गोष्टी समजून घेतात पण त्या गोष्टी नीट शांतपणे पाहिल्यास त्यातील खरी बाब उघड होते असा त्या फोटोमधला आशय आहे. आपल्या वडिलांनी केलेल्या वक्तव्याबाबत ऐकीव गोष्टींवरून मतं तयार करू नका तर स्वत: डोळसपणे त्या प्रकरणाकडे पाहा असा संदेश रोहनने या ट्विटमध्ये दिल्याचं दिसत आहे.

गावसकरांच्या विधानावर अनुष्काने व्यक्त केली नाराजी

सुनील गावसकर यांनी अशाप्रकारे उपरोधिक टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली आणि तिने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. “इतर खेळाडूंच्या कामगिरीसाठी त्यांच्या जोडीदारांना नावं ठेवली जात नाहीत. तशी वागणूक मला केव्हा मिळणार? मी अपेक्षा करते की पुढच्या वेळी तुम्ही विराटच्या खेळीचं वर्णन करताना माझा संदर्भ येऊ देणार नाही”, अशा स्पष्ट शब्दात अनुष्काने गावसकर यांना सुनावलं.

सुनील गावसकर यांनी दिलं स्पष्टीकरण

“ज्यांना माझ्या वक्तव्यावर आक्षेप असेल किंवा ज्यांना कोणाला माझं वक्तव्य खटकलं असेल, त्यांनी ती क्लिप नीट ऐका आणि मला सांगा की मी काय चुकीचं बोललो? मी अनुष्काला दोषी ठरवलं नाही. कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणीही केलेली नाही. तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडीओ बघा. मी काय बोललो ते नीट ऐका मग हवं ते खुशाल बोला. शीर्षकांवर (हेडलाइन्सल) विश्वास ठेवू नका. स्वत: व्हिडीओ बघा. मी माझ्या भूमिकेबाबत साशंक नाही”, असं रोखठोक मत गावसकर यांनी मांडलं.