१४ फेब्रुवारी २०१९ साली पाकिस्तानी अतिरेक्यांकडून केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) च्या जवानांवर हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात झालेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानी कोंडी करण्यास सुरुवात केली. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायुसेनेने बालाकोटमध्ये अतिरेकी तळांवर हल्लाही केला. या दुर्देवी घटनेनंतर आज ७-८ महिन्यांचा काळ उलटून गेला. समाजातील अनेक लोकांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची जबाबदारी घेतली आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही आपली जबाबदारी पूर्ण करत, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांना आपल्या शाळेत क्रिकेटचे धडे देतो आहे. सेहवागने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मुलांचे शाळेत खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

शहीद राम वकिल यांचा मुलगा अर्पित सिंह आणि शहीद विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग हे सेहवागच्या शाळेत शिकत आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च विरेंद्र सेहवागने उचलला आहे. काही दिवसांपूर्वी विरेंद्र सेहवागचा साथीदारी गौतम गंभीरनेही दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या १०० मुलांची जबाबदारी स्विकारली आहे.