विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. या पराभवाचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी पराभवाच्या कारणांबद्दल चर्चा करणार आहे. मात्र भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर पलंदाज वासिम जाफरने, नेतृत्वबदलाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वासिम जाफरने, मर्यादीत षटकांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे देण्याची वेळ आली आहे का?? असा प्रश्न विचारला आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेत रोहितला भारतीय संघाचं नेतृत्व करताना पाहणं मला आवडेल, असं म्हणत वासिम जाफरने नवीन चर्चेला तोंड फोडलं आहे.

भारतीय संघ विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात निवड समिती विराट कोहली आणि काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्मा या दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : टीम इंडियामध्ये गटबाजी? निर्णय प्रक्रियेवरुन विराट-रोहितमध्ये मतभेद