आठवडय़ाची मुलाखत :  हेन्री मेनेझेस, भारताचे माजी फुटबॉलपटू

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. फुटबॉल या खेळालाही करोनाची मोठी झळ बसली. परंतु आता करोनाचा कहर काहीसा कमी झाल्यानंतर स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नव्या जोमाने सुरुवात करावी लागेल, असे मत भारतीय फुटबॉल संघाचे माजी गोलरक्षक तसेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) तांत्रिक समितीचे उपाध्यक्ष हेन्री मेनेझेस यांनी व्यक्त केले.

करोनामुळे अनेक वर्षांपासून जय्यत तयारी केलेली महिलांची १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. जवळपास एका वर्षांचे फुटबॉलचे वेळापत्रक रद्द करावे लागले. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्पर्धाचे आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. गोव्यात सुरू असलेली इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल तसेच कोलकात्यात सुरू असलेल्या आय-लीगचा अपवाद वगळता अन्य फुटबॉल स्पर्धाच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, याविषयी मेनेझेस यांच्याशी केलेली बातचीत-

’ करोनामुळे जवळपास वर्षभर एकही स्पर्धा होऊ शकली नाही. याचा किती फटका महाराष्ट्राला बसला?

करोनाच्या काळात प्रत्येकाने सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे होते. पुढे काय होईल, याची कल्पना कुणालाही नव्हती. टाळेबंदीदरम्यान सरकारने प्रत्येकासाठी कडक नियम केले. त्यामुळे फक्त क्रीडा स्पर्धाच नव्हे तर सर्वच घटकांना करोनाची मोठी झळ बसली. राज्य सरकारने करोनादरम्यान खूप चांगले काम करत असताना खेळांना अखेरचे प्राधान्य दिले होते. करोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आता स्पर्धा आयोजनाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

’ आता स्पर्धाचे आयोजन करताना कोणती आव्हाने पेलावी लागणार आहेत?

जैवसुरक्षित वातावरणात स्पर्धा आयोजित करणे खूपच महागडे आहे. आता हळूहळू करोनाची जनजागृती करून स्पर्धा भरवण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने आखून दिलेली प्रमाणित कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणीसुद्धा आम्हाला करावी लागणार आहे. त्याचबरोबर जबाबदारीने आणि नव्या जोमाने आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. प्रत्येक खेळाने सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यायला हवे.

’ इंडियन सुपर लीग आणि आय-लीग या स्पर्धा एकाच ठिकाणी सुरू असल्याने भविष्यात या स्पर्धाच्या लोकप्रियतेवर किती परिणाम होईल?

जैवसुरक्षित वातावरणात घरच्या आणि बाहेरच्या मैदानावरील सामने एकाच ठिकाणी खेळवले जात आहेत. मुळातच सकाळी उठल्यानंतर सर्व फुटबॉलपटूंना वेगवेगळ्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अन्य ठिकाणी जाऊन सामने खेळणे शक्य होणार नाही. ‘आयएसएल’ आणि आय-लीग या स्पर्धाची लोकप्रियता अफाट आहे. पूर्वी ‘आयएसएल’चे सामने संथ गतीने होत होते. आता कमालीची स्पर्धा वाढत चालली असून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सामने पाहताना वेगळाच आनंद मिळत आहे. युरोपमध्ये अनेक फुटबॉलपटूंना करोनाची लागण झाली आहे. पण ‘आपला खेळ, आपली जबाबदारी’ या ब्रिदवाक्यानुसार सुरू असलेल्या आयएसएलमध्ये अद्याप तसा प्रकार घडलेला नाही. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी स्पर्धा भरवून जैवसुरक्षित वातावरणात खेळाडू सुरक्षित राहतील, याची हमी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतली आहे.

’ महिलांची १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आली, त्याविषयी काय सांगाल?

देशातील सहा शहरांमध्ये ही प्रतिष्ठेची स्पर्धा होणार होती. प्रत्येक शहराने या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली होती. भारतीय महिला संघही चांगल्या तयारीत होता. पण आता स्पर्धा लांबणीवर पडल्याने संघातील काही खेळाडूंनी १७ वयोगटाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे करोनाच्या कारणास्तव त्यांची या स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली. त्यांना आता २० वर्षांखालील आशिया चषकात खेळण्याची संधी मिळेल. भारतीय संघाला या अनुभवी खेळाडूंची उणीव नक्कीच जाणवेल. आता भारतीय संघात नव्या खेळाडूंचा समावेश होईल आणि त्यांच्यासाठी सराव शिबिरांचे आयोजन करावे लागेल.