१९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये खेळलेले भारताचे माजी फुटबॉलपटू फॉर्चुनाटो फ्रॅन्को यांचे आज सोमवारी गोव्यात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गोव्याकडून ऑलिम्पिकमध्ये खेळणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते. ११९६२मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या संघाचेही ते सदस्य राहिले आहेत. माजी मिडफिल्डर फॉर्चुनाटो यांनी आपला शेवटचा सामना जकार्तामध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध खेळला होता, त्यात त्यांनी जरनैल सिंग यांनी केलेल्या गोलला असिस्ट केले होते.

 

१९३७मध्ये गोव्याच्या कोलवले येथे जन्मलेले फॉर्चुनाटो हे वयाच्या सहाव्या वर्षी परिवारासोबत मुंबईला आले. तेथे त्यांनी नंतर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि संतोष ट्रॉफीमध्ये राज्य संघाचे कर्णधारपद भूषवले. मुंबईतील पश्चिम रेल्वे व टाटा फुटबॉल क्लबकडूनही ते खेळले. १९६०मध्ये त्यांनी रोम ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

 

भारतीय फुटबॉल संघासाठी ५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या फॉर्चुनाटो यांना १९६६मध्ये गुडघ्याला दुखापत झाली व त्यामुळे त्यांची कारकीर्द छोटी झाली. फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर फॉर्चुनाटो यांनी टाटा समूहामध्ये जनसंपर्कातील वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर १९९९मध्ये या कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर ते गोव्यात परतले.