चंडीगढ : १९५८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

‘‘माझे वडील बलबीर सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे रविवारी झोपेतच निधन झाले,’’ अशी माहिती त्यांची मुलगी मनदीप सामरा यांनी मंगळवारी दिली. त्यांचा मुलगा कॅनडात निवासास असून, करोनाच्या साथीमुळे तो अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही.

बलबीरयांचा जन्म २ मे १९३२ या दिवशी जालंधर येथील संसारपूर येथे झाला. या जिल्ह्य़ाने देशाला अनेक हॉकीपटू दिले आहे. बलबीर वयाच्या सहाव्या वर्षांपासून हॉकीकडे वळले. जालंधरमधील लायॉलपूर खालसा महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. १९५१मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात प्रथमच निवड झाली. १९६२मध्ये ते सेनादलात अधिकारीपदावर रुजू झाले. राष्ट्रीय स्पध्रेतही त्यांनी सेनादलाचे प्रतिनिधित्व केले. १९८४मध्ये निवृत्त झाले, तेव्हा त्यांचा हुद्दा मेजर असा होता. मग ते चंडीगढमध्येच स्थायिक झाले.