भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३ साली वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभवाचा धक्का देऊन पहिल्यांदा विश्वचषक जिंकणाऱ्या कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता कपिल देव यांच्या छातीत दुखायला लागलं. तपासणीसाठी साऊथ दिल्ली भागातील ओखला परिसरात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात कपिल देव आले होते. यावेळी डॉक्टरांनी कपिल देव यांची तपासणी करुन त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली आहे.

आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांनी ट्विट करत आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. लवकर बरा होईन असं म्हणत कपिल देव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

दरम्यान फोर्टीस रुग्णालयाने कपिल देव यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराबद्दल माहिती दिली आहे. फोर्टीस रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अतुल माथूर यांच्या नेतृत्वाखाली कपिल देव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते आयसीयूत असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.