भारताचा माजी नेमबाजपटू जॉयदीप कर्माकरला ट्विटरवर सचिन तेंडुलकरच्या इंग्रजीची खिल्ली उडवणं चांगलंच महागात पडलं आहे. अमरनाथ यात्रेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सचिनने केलेल्या ट्वीटमध्ये, जॉयदीपने इंग्रजी व्याकरणाच्या चुका काढत सचिनच्या भारतरत्न किताबावर उपहासात्मक टीका केली.

तीन दिवसांपूर्वी जम्मू काश्मिरच्या अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला. ज्यात काही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नागरिकांबद्दल आपली सहानुभूती दर्शवताना सचिनने ट्वीटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

सचिनच्या या ट्वीटमध्ये कोणताही आक्षेपार्ह असा भाग नव्हता. मात्र अशा गंभीर प्रसंगातही कर्माकरने सचिनच्या इंग्रजी व्याकरणावर चुका काढत त्याला मिळालेल्या भारतरत्न किताबावर उपहासात्मक टीका केली.

मात्र सचिनवर टीका करणं जॉयदीपला चांगलंच महागात पडलं. ट्वीटरवर सचिनच्या चाहत्यांनी जॉयदीपची यथेच्छ धुलाई केली.

२०१२ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मिटर रायफल प्रकारात जॉयदीप कर्माकर चौथ्या स्थानावर राहिला होता. २०१२ साली जॉयदीप कर्माकरला मानाच्या अर्जुन किताबाने गौरवण्यात आलं होतं. मात्र सचिनला ट्रोल करण्याचा त्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडलेला दिसतोय.