भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा आयपीएलचा मागील हंगामाचा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक बनला आहे. फ्रेंचायझीने आज रविवारी याबाबत घोषणा केली.

 

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 39 वर्षीय अजय आसाम संघाचा प्रशिक्षक होता. यापूर्वी तो पंजाबचाही प्रशिक्षकही होता. भारतीय महिला संघाचा क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक म्हणून तो प्रथमच आयपीएलच्या फ्रेंचायझीशी जोडला गेला आहे.

2002मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी अजय कसोटीत शतक ठोकणारा सर्वात युवा यष्टीरक्षक ठरला होता. त्याने भारताकडून सहा कसोटी आणि 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. अजय म्हणाला, “दिल्लीसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करणे हा माझा सन्मान आहे. संघातील हुशार खेळाडूंसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. संघाला भेटण्यासाठी आणि त्यांच्या यशात हातभार लावण्यास मी अजून वाट पाहू शकत नाही. ही संधी दिल्याबद्दल मी दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाचा आभारी आहे.”

आयपीएलपूर्वी दिल्लीला जबर धक्का

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलपूर्वी दिल्लीच्या संघाला जबर धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलबाहेर गेला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली. 26 वर्षीय मुंबईकर श्रेयसवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे किमान तो चार महिने मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. दिल्लीचा पहिला सामा 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत होणार आहे. आता संघ व्यवस्थापनासमोर नवीन कर्णधार निवडण्याचे आव्हान आहे.