महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अभय आपटे यांचा आक्षेप

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील सुधारणांसाठी लागू करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशींमध्ये कार्यकारिणी समितीवरील कौटुंबिक नियंत्रणाबाबत कोणतेही कलम नाही. ज्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यांचे कुटुंबीय आता कार्यकारिणीवर कार्यरत आहेत, असा आक्षेप महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अभय आपटे यांनी घेतला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन मुलगी रुपा गुरुनाथ हिच्याद्वारे तमिळनाडू क्रिकेट संघटना चालवत आहे. निरंजन शाह यांचा मुलगा जयदेव सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचा सचिव आहे, अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचा प्रमुख आहे, तर तुरुंगात असलेल्या आशीर्वाद बेहेरा यांचा मुलगा संजय ओदिशा क्रिकेट संघटनेचा सचिव झाला आहे. याचप्रमाणे बडोद्यात चिरायू अमितनचा मुलगा प्रणव नवा अध्यक्ष झाला आहे, तर राजस्थान क्रिकेट संघटनेवर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

‘‘लोढा समितीने कोणत्या सुधारणा सुचवल्या ते आता मला लक्षात आले आहे. हे उत्तम प्रकारे आणि कायदेशीर आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या विधि समितीचे सदस्य आपटे यांनी सांगितले.

‘‘सत्तेचे केंद्रीकरण नसावे आणि कार्यकाळाला वर्षांचे बंधन असावे. याचा अर्थ एकाच व्यक्तीकडे संघटनेचा ताबा राहणार नसला तरी मुलगा, मुलगी, भाऊ, इत्यादी कुटुंबातील अन्य सदस्याकडे पदभार देता येऊ शकतो,’’ असे मत आपटे यांनी व्यक्त केले.