भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे करोनामुळे जयपूरमधील रुग्णालयात शनिवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. ज्येष्ठ प्रशासक रुंगठा यांना करोनाची लागण झाल्यामुळे गेल्या आठवडय़ात रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या कालखंडात ५९ सामन्यांत राजस्थानकडून खेळताना एकूण २७१७ धावा केल्या. निवृत्तीनंतर १९९८ मध्ये राष्ट्रीय निवड समितीमध्ये मध्य विभागाकडून स्थान मिळवले.

सत्तरच्या दशकात रुंगठा यांचे दिवंगत बंधू पुरुषोत्तम यांनी ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्षपद भूषवले होते. पुरुषोत्तम यांचा मुलगा किशोर यांनी २०००च्या पूर्वार्धात हेच पद भूषवले. रुंगठा कुटुंबीयांनी पाच दशके राजस्थान क्रिकेट प्रशासनावर राज्य गाजवले. २००५ मध्ये ललित मोदी यांनी रुंगठा यांना निवडणुकीत पराभूत करून राजस्थानच्या क्रिकेट सत्तेवर ताबा मिळवला.