पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक याने काही दिवसांपुर्वी हार्दिक पांड्याला प्रशिक्षण देण्याची ऑफर दिल्याने चर्चेत आला होता. मात्र सध्या एका वेगळ्या कारणामुळे तो चर्चेत आहे. लग्नानंतर आपले चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते असा खुलासा अब्दुल रझाकने केला आहे. एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना अब्दुल रझाकने खुलासा केला.

यावेळी अब्दुल ऱझाकने या सर्व संबंधांना एक्स्पायरी डेटही होती असंही सांगितलं. ३९ वर्षीय अब्दुल रझाकने पुढे बोलताना सांगितलं की, “काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची’. यावेळी शोच्या अँकरने ही सर्व प्रेम प्रकरणं लग्नाआधी होती की नंतर असं विचारलं असता अब्दुल रझाकने लग्नानंतर होती अशी माहिती दिली.

याआधी अब्दुल रझाकने हार्दिक पांड्याची स्तुती करताना आपण त्याला जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करु शकतो असा विश्वास व्यक्त केला होता. हार्दिक पांड्याच्या फलंदाजीत अनेक त्रुटी असल्याचं अब्दुल रझाकचं म्हणण आहे. पुढे त्याने सांगितलं होतं की, “जर मी त्याला प्रशिक्षण देऊ शकलो, उदाहरणार्थ युएईमध्ये, तर त्याला जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनवू शकतो. जर बीसीसीआय त्याला एक चांगला अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी इच्छुक असेल तर मी नेहमीच उपलब्ध आहे”.

अब्दुल रझाकने २६५ एकदिवसीय सामने खेळले असून ५०८० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच २६९ विकेट्स घेतल्या असून ३५ धावांवर सहा विकेट्स ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.