इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज माजी फिरकीपटू माँटी पानेसारच्या विधानावर असहमती दर्शवत पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने एक प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच माँटी पानेसारने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना टीम इंडियाच्या यशाचे श्रेय दिले होते. मात्र, सलमान बटने हे विधान चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ”अशा वक्तव्यांचा काही अर्थ नाही”, असे बट म्हणाला.

टीमच्या यशाचे श्रेय एका व्यक्तीला कसे देता येईल, या पानेसारच्या वक्तव्याबद्दल सलमान बटने नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ”संघाच्या कामगिरीचे श्रेय तुम्ही एकट्याला कसे देऊ शकता. विराट कोहली त्या संघाचा सर्वात मोठा खेळाडू आहे आणि इतर खेळाडूंनीही आपले योगदान दिले आहे. आपल्याला अशी विधाने ऐकली नाही पाहिजेत.”

हेही वाचा – VIDEO : काऊंटी क्रिकेटचा धोनी..! चित्याच्या गतीनं यष्टीरक्षकानं केलं फलंदाजाला बाद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर रवी शास्त्री यांनी संघाचा आत्मविश्वास वाढविला आणि संघ जिंकला, असे एका मुलाखती दरम्यान माँटी पानेसार म्हणाला होता. म्हणूनच पानेसारने टीम इंडियाला रवी शास्त्रींचा संघ असे म्हटले.

सलमान बट्ट पुढे म्हणाला, ”विराट कोहलीनेही टीम बनवली आहे. रवी शास्त्री आणि कोहली यांनी मिळून संघ वाढविला आहे आणि माझ्या मते दोघांनाही श्रेय मिळाले आहे. जेव्हा हे सर्व एकत्र संघ चालवत आहेत, तेव्हा संघाच्या यशाचे श्रेय एका व्यक्तीला कसे देता येईल? मला असे वाटते, की त्याच्या शब्दांना कोणताही अर्थ किंवा तर्क नाही. म्हणून त्यांनी या प्रकारचे विधान देऊ नये.”