भारतात करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आतापर्यंत देशात ३० लाखांहून जास्त करोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर रोज २००० लोकांचा जीव जात आहे. भारतात ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा असून अनेक रूग्णालयातही ऑक्सिजनची कमतरता आहे. भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

भारताचा शेजारील देश पाकिस्तानचा दिग्गज माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारतीय लोकांसाठी प्रार्थना केली. अख्तरने भारतातील लोकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, ”भारत खरोखर करोनाशी लढत आहे. जागतिक समर्थनाची गरज आहे. आरोग्य सेवा यंत्रणा क्रॅश होत आहे. हा एक साथीचा रोग आहे, आपण सर्व यात एकत्र आहोत. आपण एकमेकांचा आधार बनलो पाहिजे.”

 

यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये अख्तर म्हणाला, ”भारतीय जनतेसाठी मी प्रार्थना करतो. मला आशा आहे, की लवकरच गोष्टी नियंत्रणात येतील आणि त्यांचे सरकार हे संकट अधिक चांगल्या प्रकारे हाताळेल. आपण सर्व यात एकत्र आहोत.”

 

इम्रान खान यांचेही भारतासाठी ट्विट

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय उपकरण, ऑक्सिजन याची उणीव भासत आहे. तसेच रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची रुग्णालयाबाहेर रांग लागली आहे. अनेकांना बेड मिळत नाही. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचे सांत्वन करणारे ट्विट केले आहे.

 

‘‘करोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना समजू शकतो. या करोनामुळे पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते लवकर बरे व्हावे. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणे आवश्यक आहे’’, असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.