गतवर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल माफी मागण्याचा भारताचा प्रस्ताव पाकिस्तानच्या माजी हॉकी प्रशिक्षकांनी फेटाळला आहे. पाकिस्तानच्या संघाला हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी होऊन द्यायचे नसल्यामुळेच अशी कारणे पुढे करण्यात येत असल्याचा आरोप शहनाज शेख यांनी केला आहे. पाकिस्तान संघात अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचे हॉकी इंडिया लीगमध्ये स्वागतच होईल, मात्र त्यांच्या बेशिस्त वर्तनास आम्ही थारा देणार नाही. या गैरवर्तनासाठी त्यांनी माफी मागितली तरच त्यांचा स्पर्धेसाठी विचार करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शहनाज शेख यांनी भारताच्या माफी मागण्याच्या प्रस्तावाचा निषेध केला. मी बात्रांच्या या मागणीने नाराज आहे. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतो, ते खूप चांगली व्यक्ती आहेत. त्यामुळे कोणीतरी त्यांच्या तोंडून हे सगळे वदवून घेत असल्याची शंका मला वाटते, असे शहनाज शेख यांनी म्हटले. याशिवाय, आगामी हॉकी लीगमध्ये पाकिस्तानी संघ भारताला योग्य प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले. मुळात अशाप्रकारच्या माफीनाम्याची मागणी आत्ता का होत आहे, हे समजण्यापलीकडे आहे. कदाचित पाकिस्तानला या स्पर्धेत खेळून द्यायचे नसल्यामुळे अशी मागणी होत असावी किंवा गेल्यावर्षीचा चॅम्पियन्स स्पर्धेतील पराभव अजून भारताला पचवता आलेला नसावा, असा टोला यावेळी शेख यांनी लगावला.
गतवर्षी चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी बेशिस्त वर्तन केले होते तेव्हा शहनाज शेख पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना दिशेने अपशब्द उच्चारले होते. मात्र, त्यावेळी पाकिस्तान हॉकी फेडरेशन, पाकिस्तानी संघ आणि मी स्वत: झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती. त्यामुळे आता पुन्हा माफी मागण्याची गरज काय, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला.