पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज माजी गोलंदाज वकार युनूसवर एक मोठा आरोप लावण्यात आला आहे. हा आरोप पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफने लावला आहे. बॉल स्विंग करण्यासाठी वकार चिटिंग करायचा, असे आसिफने सांगितले.

पाकिस्तानच्या एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आसिफ म्हणाला, ”वकार युनूसला नवीन चेंडूने कशी गोलंदाजी करायची हे माहीत नव्हते. कारकीर्दीच्या शेवटी त्याने ही कला शिकली. वकार युनूस चेंडूला स्विंग करण्यासाठी चिटिंग करायचा करायचा. कारकिर्दीत नवीन चेंडूसह गोलंदाजी कशी करावी हे त्याला माहित नव्हते.”

वकार युनूस हा पाकिस्तानच्या महान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. तो त्याच्या रिव्हर्स स्विंगसाठी ओळखला जात होता. 1990च्या दशकात वसीम अक्रमसोबत त्याने फलंदाजामध्ये आपल्या गोलंदाजीमुळे दहशत निर्माण केली होती.

वकार युनूसच्या कोचिंगबाबतही आसिफने उठवले सवाल

मोहम्मद असिफने वकार युनूसच्या कोचिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तो म्हणाला, “लोकांच्या मते वकार युनूसने रिव्हर्स स्विंगमध्ये वरचा दर्जा मिळविला. परंतु एकाही गोलंदाजाला तो ही कला शिकवू शकला नाही. 20 वर्षांपासून हे लोक कोचिंग देत आहेत, पण त्यांना दर्जेदार गोलंदाज तयार करता आले नाहीत. आपल्याकडे बरेच गोलंदाज आहेत, पण त्यांच्यात गुणवत्तेचा अभाव आहे.”

वकार आणि आसिफची क्रिकेट कारकीर्द

1989 ते 2003 या कारकिर्दीत वकार युनूसने 87 कसोटीत 373 तर, 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 416 फलंदाजांना माघारी धाडले आहे. दुसरीकडे आसिफने 2005 ते 2010 या कालावधीत 23 कसोटीत 106, 38 एकदिवसीय सामन्यात 46 तर, 11 टी-20 सामन्यात 13 बळी घेतले आहेत.