भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांची हकालपट्टी करण्याच्या हॉकी इंडियाच्या निर्णयाचे अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी समर्थन केले आहे. तसेच त्यांनी माजी ऑलिम्पिकपटू एम. के. कौशिक यांच्याकडे संघाच्या मार्गदर्शकपदाची सूत्रे देण्याची शिफारस केली आहे. अजितपालसिंग- खरंतर ही गोष्ट अगोदरच करायला पाहिजे होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये बारा संघांमध्ये आपल्याला बारावे स्थान मिळाले, तेव्हाच नॉब्स यांची हकालपट्टी करणे आवश्यक होते. भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्याची क्षमता नॉब्स यांच्याकडे नाही. नॉब्सपेक्षा अगोदरचे प्रशिक्षक होजे ब्रासा बरे अशी प्रतिक्रिया अनेक वेळा भारतीय संघातील खेळाडूंनी दिली होती मात्र त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नव्हता. आता हॉकी इंडियास शहाणपण सुचले आहे. कौशिक यांना प्रशिक्षक म्हणून बोलविण्याचा निर्णय योग्यच आहे.
जफर इक्बाल- भारतीय संघाने नॉब्स यांच्या मार्गदर्शनाखाली फारशी प्रगती केलेली नाही. तरीही मला नॉब्स यांच्याविषयी सहानुभूती वाटते. ते प्रशिक्षक म्हणून चांगले आहेत मात्र भारतीय खेळाडूंबरोबर ते चांगल्या रीतीने संवाद साधू शकले नाहीत. तसेच त्यांना पूर्वीसारखे अव्वल दर्जाचे खेळाडू मिळू शकले नाहीत. परदेशी प्रशिक्षकापेक्षा भारतीय प्रशिक्षकावर खेळाडूंचा जास्त विश्वास राहू शकेल.
जॉकीम काव्‍‌र्हेलो- आपण परदेशी प्रशिक्षकांचा प्रयोग अनेक वेळा केला आहे. असे प्रयोग करण्याचे थांबविणे जरुरीचे होते. कौशिक यांच्याकडे प्रशिक्षकाची जबाबदारी देण्याचा निर्णय योग्यच आहे.