महाराष्ट्र आणि मुंबईचे माजी रणजीपटू रघुनाथ रामचंद्र चांदोरकर हे शनिवारी वयाची १०० वर्षे पूर्ण करणार आहेत. प्राध्यापक दिनकर बलवंत देवधर (पुणे) आणि वसंत रायजी (मुंबई) यांच्यानंतर चांदोरकर (डोंबिवली) हे वयाची शंभरी गाठणारे तिसरे रणजीपटू ठरले आहेत.

मधल्या फळीतील फलंदाज आणि लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या चांदोरकर यांनी १९४३-४४ ते १९४६-४७ या कालावधीत पाच रणजी सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर १९५०-५१च्या मोसमात ते मुंबईकडून दोन रणजी सामने खेळले. त्यानंतर चांदोरकर सध्या डोंबिवलीत राहत असून गेली सहा वर्षे ते आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत.

देवधर यांच्या नेतृत्वाखाली चांदोरकर हे पुण्यातील एसपी महाविद्यालय आणि पीवायसी जिमखान्याकडूनही खेळले होते.

१९४६ साली लिंडसे हासेटच्या नेतृत्वाखाली आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चांदोरकर यांनी वेस्टर्न मराठा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ठाणे-डोंबिवली क्रिकेट संघासोबत ते वयाच्या ७३व्या वर्षी केनियाच्या दौऱ्यावर गेले होते. ‘‘१९७०च्या दशकात चांदोरकर हे प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या पट्टय़ांत त्यांच्या नावाचा दबदबा होता,’’ असे डोंबिवली क्रिकेट क्लबचे सचिव मुरलीधर मराठे यांनी सांगितले.