News Flash

”ऋषभ पंत भारताला कसोटीत 10 वर्षे देईल, पण वृद्धिमान साहा नाही”

वाचा कोणी केलंय हे वक्तव्य

वृद्धिमान साहा आणि ऋषभ पंत

माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ते सरनदीप सिंग यांनी भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे कौतुक केले आहे. तंदुरुस्ती आणि तांत्रिक मुद्द्यांबाबत घेतलेल्या मेहनतीमुळे सरनदीप सिंग यांनी ऋषभचे अभिनंदन केले आहे. कसोटीत भारताचा पहिला पर्याय म्हणून पंत 10 वर्षे खेळू शकतो, पण वृद्धिमान साहाच्या बाबतीत असे काही सांगू शकत नाही, असे सरनदीप यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या संघातून वगळल्यानंतर पंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अडथळा निर्माण झाला होता.  पण पंतने कसोटीत जबरदस्त पुनरागमन केले आणि सिडनी आणि अॅडलेडमध्ये उत्तम कामगिरी करून मालिकाविजयात भारताला मदत केली. हाच फॉर्म त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दाखवला.

पंतने इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या स्वरूपातही उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे आयपीएल 2021 आधी तो चर्चेचा विषय बनला आहे.

सरनदीप म्हणाले, “पंतचे कितीही कौतुक केले तर, ते पुरेसे ठरणार नाही. त्याला तंदुरुस्तीच्या समस्या होत्या. त्यावर त्याने काम केले. कोणते फटके खेळावे, यावरही त्याने मेहनत घेतली. जर 21 वर्षाच्या मुलाकडून तुम्ही 30 वर्षाच्या मुलासारखे खेळण्याची अपेक्षा केली, तर ते कठीण आहे. तुम्ही हार्दिकला पाहा. आता तो अनुभवी क्रिकेटपटूसारखा फलंदाजी करतो. ही गोष्ट पंतमध्ये गेल्या सहा महिन्यांत दिसून आली आहे. तो संघाबाहेर होता, ते त्याच्यासाठी चांगले होते. प्रत्येक चेंडू खेळण्याची वेळ असते. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला बराच अनुभव मिळाला आहे. पंत पहिल्या क्रमांकाची निवड ठरल्याने तो तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये दहा वर्षे देऊ शकतो. मात्र, साहाच्या बाबतीत असे काही सांगू शकत नाही.”

पंतकडे दिल्लीची धुरा

श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व कोण करणार? याचे उत्तर शोधणे कठीण झाले होते. मात्र अखेर अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या नावांमधून ऋषभ पंतचे नाव अंतिम करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये ऋषभ पंतने दाखवलेल्या मर्दुमकीच्या जोरावर त्याला कर्णधारपद मिळाल्याची भावना त्याच्या चाहत्यांकडून आता व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे डावखुऱ्या रिषभ पंतचा जलवा आयपीएलमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 10:53 am

Web Title: former selector sarandeep singh on rishabh pant and wriddhiman saha adn 96
टॅग : Rishabh Pant
Next Stories
1 ”ट्विटर उघडलं तेव्हा माझा नवरा…”, होळीच्या फोटोवर अक्रमच्या बायकोची प्रतिक्रिया
2 न्यूझीलंड-बांगलादेश टी-२० मॅचमध्ये विचित्र प्रकार, विजयी लक्ष्य माहित नसतानाही बॅटिंगसाठी उतरले ओपनर
3 ऑलिम्पिकचे आयोजन धोक्याचे!
Just Now!
X