भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिनेश सैन याच्यावर शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे. दिनेशने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच ‘नाडा’मध्ये शिपाई पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. जन्मापासूनच पोलिओग्रस्त असलेल्या दिनेशने २०१५-२०१९ या कालावधीत भारताच्या दिव्यांग संघासाठी नऊ सामने खेळले. त्याने संघाचे नेतृत्वदेखील केले. वयाच्या ३५व्या वर्षी कुटुंबाच्या पालनपोषणाच्या दृष्टीने तो नोकरी शोधत असून त्याने शिपाई पदासाठी अर्ज केला आहे.

“माझं वय ३५ आहे. मी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला आहे. १२वी नंतर मी फक्त क्रिकेट खेळलो. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं. पण सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. ‘नाडा’मध्ये सध्या एक पद रिक्त आहे. त्यामुळे मी शिपाई पदासाठी अर्ज केला आहे”, असे त्याने सोनीपत येथे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

दिनेशचा मोठा भाऊ सध्या दिनेशच्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहे. पण असे किती दिवस चालणार असा विचार करत सध्या दिनेश नोकरीच्या शोधात आहे. दिनेश आणि त्याच्या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन विविध स्तरातून करण्यात येत आहे.