भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच महान लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका बसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून येत्या काही दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येईल, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

७५ वर्षीय बीएस. चंद्रशेखर यांना शुक्रवारी संध्याकाळी थकवा जाणवत होता आणि बोलतानाही त्रास होत होता. त्यानंतर पत्नी संध्या यांनी त्यांना अ‍ॅस्टर आरव्ही रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ‘‘चंद्रशेखर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बुधवारी किंवा गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात येईल,’’ असे संध्या यांनी सांगितले.

‘‘मेंदूत काही ठिकाणी रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका बसला, मात्र काळजी करण्यासारखे काहीही नाही. योग्य औषधोपचार तसेच फिजियोथेरपीने ते येत्या दोन आठवडय़ांत पूर्ण बरे होतील. प्रबळ इच्छाशक्ती असल्याने ते या संकटावर मात करतील, अशी खात्री आहे,’’ असेही संध्या यांनी सांगितले.

आपल्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत ५८ कसोटींमध्ये चंद्रशेखर यांनी २४२ बळी मिळवले आहेत. १९६०-७०च्या दशकात चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी, ईरापल्ली प्रसन्ना व एस. वेंकटराघवन या फिरकी चौकडीने भारतासाठी अनेक सामने जिंकले. चंद्रशेखर यांना अर्जुन तसेच १९७२मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.