आठवडय़ाची मुलाखत : कमलेश मेहता, माजी टेबल टेनिसपटू आणि प्रशिक्षक

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : देशावर ओढवलेले करोनाचे संकट कधी दूर होईल, हे ठामपणे सांगू शकत नाही; परंतु करोनानंतरच्या काळात दुहेरीतील टेबल टेनिसपटूंना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी टेबल टेनिसपटू आणि प्रशिक्षक कमलेश मेहता यांनी व्यक्त केली.

जुलै महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने (आयटीटीएफ) सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत. त्यामुळे टेबल टेनिसच्या स्पर्धाना प्रारंभ होण्यासाठी अद्याप दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे; परंतु भविष्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यप्रणाली आखण्यासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघ (टीटीएफआय) कार्यरत असून यामध्ये खेळाडू तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे, असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी सांगितले. एकंदर टेबल टेनिसपुढील आव्हाने आणि खेळाडूंच्या मानसिक तंदुरुस्तीच्या महत्त्वाविषयी मेहता यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

* भारतातील क्रीडा क्षेत्राला कधीपर्यंत उभारी मिळेल, असे तुम्हाला वाटते?

खरे तर कोणीही याविषयी ठामपणे सांगू शकत नाही. जोपर्यंत करोनावर उपाय मिळत नाही अथवा मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही, तोपर्यंत तरी भारतातील क्रीडा क्षेत्राच्या पुनरागमनाबाबत संभ्रम कायम असेल. जर्मनी, कोरिया यांसारख्या देशांत फुटबॉल स्पर्धाना सुरुवात झाली असली तरी तेथे अत्यंत काटेकोरपणे अनेक नियमांचे पालन केले जात आहे.

* आगामी काळात टेबल टेनिसमध्ये तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत?

टेबल टेनिसमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. यामध्ये गुणपद्धतीपासून ते चेंडूच्या आकारापर्यंत अनेक बदलांचा उल्लेख करत येईल. त्यामुळे सध्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये टेबल टेनिसमध्ये कोणते बदल करावेत, याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहेत; परंतु याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. कदाचित यापुढे खेळाडूंना प्रत्येक गेमनंतर बाजू बदलता येणार नाही. तसेच टेबलला स्पर्श करण्यास त्यांना मनाई केली जाऊ शकते. एकेरीतील खेळाडूंना नियमांचे पालन करणे फारसे अवघड नसेल; परंतु दुहेरीतील खेळाडूंच्या स्पर्धाचे आयोजन करताना महासंघाला विचार करावा लागू शकतो. कारण दुहेरीमध्ये अजाणतेपणे खेळाडूंकडून सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन होऊ शकते. त्याशिवाय सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतरही खेळाडूंच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्याचा विचार महासंघ करत आहे. तूर्तास केंद्र सरकारने काही निवडक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देशातील ठरावीक क्रीडा संकुलांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली आहे. टेबल टेनिसच्या दृष्टीने ही अत्यंत सुखदायक गोष्ट आहे.

* खेळाडूंनी मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी काय करावे?

कोणत्याही खेळाडूसाठी या काळात मानसिक तंदुरुस्ती राखणे अधिक आव्हानात्मक आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात क्रीडापटूंना मानसिक संतुलनावर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळत नाही; परंतु गेल्या काही महिन्यांपासून सर्व खेळाडू घरातच असल्याने त्यांना स्वत:चे आत्मपरीक्षण करण्याची सुवर्णसंधी आहे. मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळाडूंनी वाचनावर अधिक लक्ष दिले पाहिजे. काहींना घरच्या घरी व्यायाम करणे शक्य नसले तरी दिवसातून किमान एक तास योगासन करणेही फायदेशीर ठरू शकते. तसेच आता टाळेबंदीतील निर्बंध शिथिल होत असल्याने लवकरच खेळाडूंना घराबाहेर पडून व्यायाम करण्याचीही परवानगी मिळेल, अशी आशा आहे.

* पुढील पाच वर्षांत टेबल टेनिसच्या प्रगतीचा आलेख कितपत उंचावलेला असेल?

सध्या भारताकडे शरथ कमल, जी. साथियन, मधुरिका पाटकर आणि मनिका बत्रा यांसारखे एकापेक्षा एक उत्तम खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे मानव ठक्कर, सुतिर्था मुखर्जी ही युवा फळीही सातत्याने दमदार कामगिरी करीत आहे. क्रीडामंत्री आणि महासंघाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. त्याशिवाय अल्टिमेट टेबल टेनिस लीगमुळे भारतातील टेबल टेनिसपटूंची जगभरात वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे पुढील पाच वर्षांत भारत जागतिक क्रमवारीत अव्वल १० देशांत स्थान मिळवेल. तसेच पुरुष आणि महिलांच्या एकेरीत किमान आपल्या एका खेळाडूचा नक्कीच पहिल्या १० टेबल टेनिसपटूंमध्ये समावेश असेल, असे मला वाटते.