भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं मुंबईतील जसलोक रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी वाडेकरांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या जाण्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वातला एक महत्वाचा मोहरा आपल्यातून निघून गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. सध्या विराट कोहलीचा भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळतो आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची चांगलीच दाणादाण उडाली. विराटने घेतलेल्या काही निर्णयांवर अनेक माजी खेळाडूंनी चांगलीच टीकाही केली. पण १९७१ साली मराठमोळ्या वाडेकरांनी इंग्लंडला त्यांच्यात मायदेशात पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधी भारताच्या एकाही कर्णधाराला अशी किमया साधणं जमलं नव्हतं.

मुळचे मुंबईचे असलेले वाडेकर हे आपल्या फलंदाजीसाठी आणि चतुरस्त्र नेतृत्वासाठी ओळखले जायचे. १९७१ सालच्या इंग्लंड दौऱ्यात वाडेकरांनी आपल्या याच नेतृत्वगुणांचं प्रदर्शन करत भारताच्या इंग्लंडमधील पहिल्या मालिका विजयात मोलाचा हातभार उचलला होता. सध्या इंग्लिश माऱ्यासमोर कोलमडत असलेल्या विराट कोहलीच्या टीम इंडियाला अजित वाडेकरांच्या या निर्णयातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भारताचे इंग्लंडमधील तत्कालीन राजदूत अप्पासाहेब पंत यांनी मालिका विजयानंतर वाडेकर यांना सांगितलं, ” मी या मालिकेतली एक सामना पावसाने रद्द व्हावा, एक अनिर्णीत रहावा आणि एक भारताने जिंकावा अशी प्रार्थना करत होतो.” गंमत म्हणजे अप्पासाहेबांचे ही प्रार्थना देवाने ऐकली असं म्हटलं तरीही हरकत नाही. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथील अनुक्रमे पहिला व दुसरा कसोटी सामना रद्द झाला. ओव्हल येथील निर्णयाक कसोटी ४ गडी राखून जिंकत भारताने ही मालिका १-० ने जिंकली होती.

इंग्लंड दौऱ्यात कर्णधार या नात्याने वाडेकरांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. ७१ सालच्या इंग्लंड दौऱ्यात लेस्टरशायरविरुद्ध सामन्यात ख्रिस बाल्डरस्टोन आणि रॉजर हे दोन फलंदाज भारतीय फिरकीपटूंना व्यवस्थित खेळून काढत होते. वेळ निघून जात असलेला पाहून कर्णधार वाडेकर यांनी सुनील गावसकर यांच्याकडे चेंडू सोपवला. “तू मला नेहमी तुझ्या लेग-स्पिनबद्दल सांगत असतोस ना. जा बॉलिंग कर, पण तुला फक्त एक ओव्हर मिळेल”, असं म्हणत वाडेकर यांनी गावसकरांच्या हाती चेंडू सोपवला. गावसकर यांनीही रॉजरला बाद करत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. भारतीय संघाने हा सामना डावाने जिंकला होता.

या कालखंडात भारताचं बेदी-प्रसन्ना आणि चंद्रशेखर हे फिरकीचं त्रिकुट चांगलचं गाजत होतं. या दौऱ्यातही तिन्ही फिरकीपटूंनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. यावेळी वाडेकरांवर कर्णधार या नात्याने प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्यापैकी एकालाच संघात जागा देण्याचं अवघडं काम समोर आलं होतं. यावेळी वाडेकरांनी चंद्रशेखर यांना संघात स्थान दिलं होतं. इंग्लंडमधे भारताने मिळवलेल्या या विजयामुळे वाडेकरांच्या भारतीय संघाचं इंग्लंडमध्येच चांगलं कौतुक झालं. ब्रिटीश प्रसारमाध्यमांनीही भारतीय संघावर स्तुतीसुमनं उधळली. भारताने ही कसोटी मालिका १-० अशी जिंकत इतिहास घडवला होता. आजही वाडेकरांच्या संघाने मिळवलेल्या या विजयाकडे मापदंड म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे साहेबांच्या देशात चाचपडणाऱ्या विराटने वाडेकरांच्या या विजयामधून प्रेरणा घेण्यास काहीच हरकत नाही.