जागतिक क्रिकेटमध्ये कायम सर्वोत्तम कोण याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. या बाबतीत अनेक क्रिकेट जाणकार विविध नावे घेतात. सध्या क्रिकेटच्या मैदानावर खेळत असलेल्या खेळाडूंपैकी अनेकांची नावे क्रिकेट तज्ज्ञांकडून सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून सांगितली जातात. त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय हिंदी समालोचक आकाश चोप्रा याने आपल्या मनातील चार सर्वोत्तम खेळाडू कोण याचे उत्तर दिले आहे.

सामान्यत: तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अनेक क्रिकेट जाणकार सर्वोत्तम चार खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांना पसंती देतात. पण आकाश चोप्रा याने मात्र त्याच्या सर्वोत्तम चार खेळाडूंमध्ये जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांना स्थान दिलेले नाही. आकाश चोप्रा याने नुकताच एक यू ट्युब व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्याने त्याला वाटणाऱ्या सर्वोत्तम चार खेळाडूंची नावे सांगितली.

“मी पाकिस्तानच्या बाबर आझमला सर्वोत्तम चार खेळाडूंच्या यादीत स्थान देईन, कारण त्याने विराटच्या कामगिरीला टक्कर देणारी कामगिरी करून दाखवली आहे. टी २० क्रिकेटमध्ये तो जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत देखील तो तिसरा आहे तर कसोटी क्रमवारीत तो पाचव्या स्थानी विराजमान आहे. जर तुम्ही तीनही फॉरमॅटमध्ये टॉप ५ मध्ये असाल तर तुम्ही सर्वोत्तम चार खेळाडूंमध्ये असायलाच हवे. त्यामुळे १२० टक्के त्याला सर्वोत्तम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळायला हवे. त्याच्यासोबतच मी केन विल्यमसन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही सर्वोत्तम चारमध्ये समाविष्ट करेन”, असे तो म्हणाला.

बाबर आझम

दरम्यान, भारतीय संघाचा न्यूझीलंडविरूद्ध पहिला कसोटी सामना २१ फेब्रुवारीपासून होणार आहे. या सामन्यात आक्रमक विराट विरूद्ध संयमी विल्यमसन अशी झुंज पाहायला मिळणार आहे.