पदार्पणाच्या सामन्यात पहिले शतक झळकावण्याचा मान पटकावणारे भारताचे माजी फलंदाज दीपक शोधन यांचे फुप्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले, ते ८७ वर्षांचे होते.

फेब्रुवारी महिन्यात त्यांना फुप्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. सोमवारी त्यांचे राहत्या घरी सकाळी निधन झाले. सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

शैलीदार डावखुरे फलंदाज, अशी शोधन यांची ओळख होती. त्याचबरोबर ते वेगवान गोलंदाजीही करायचे. २५ व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध ईडन गार्डन्सवर १९५२ साली शोधन हे पहिला कसोटी सामना खेळले. या सामन्यात भारताची ६ बाद १७९ अशी अवस्था होती आणि सर्व बिनीचे फलंदाज तंबूत परतले होते. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शोधन यांनी ११० धावांची अप्रतिम खेळी साकारली आणि त्यामुळेच भारताला १४० धावांची आघाडी मिळवता आली होती. पण हा सामना अनिर्णित राहीला. या सामन्यानंतर शोधन यांना फक्त दोनच सामने खेळता आले. कारण त्यांची संघातील जागा विजय हजारे यांनी घेतली.

१९५३ साली भारताचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताचे जवळपास सारेच खेळाडू आजारी होते. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात शोधन यांनी ४५ आणि ११ अशा धावा केल्या. त्यानंतर शोधन हे तापाने फणफणले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे त्यांना तीन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. पण पाचव्या कसोटीमध्ये ताप असतानाही शोधन मैदानात उतरले. त्या वेळी खेळपट्टीवर अधिकाधिक काळ व्यतित करून वेस्ट इंडिजला उशिरा फलंदाजी द्यायची होती. त्या वेळी कसलीही तमा न बाळगता शोधन फलंदाजीसाठी मैदानात उतरले आणि त्यांनी बराच काळ खेळपट्टीवर व्यतित केला, त्यामुळे हा सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले.

शोधन यांनी ४३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चार शतके आणि सात अर्धशतकांच्या जोरावर १८०२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ३४.०५ च्या सरासरीने ७४ बळीही मिळवले होते.

वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या वेळी शोधन हे तापामुळे हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात फलंदाजीही करता आली नव्हती. पण दुसऱ्या डावात आम्हाला अशा एका फलंदाजाची गरज होती की जो खेळपट्टीवर अधिक काळ व्यतीत करून वेस्ट इंडिजला फलंदाजीपासून दूर नेईल. या वेळी तसलीही तमा न बाळगता शोधन फलंदाजीला उतरले आणि त्यांनी बराच वेळ खेळपट्टीवर व्यतित करीत नाबाद १५ धावा केल्या. त्यांच्या या फलंदाजीमुळेच आम्ही ही कसोटी अनिर्णित राखू शकलो.

– माधव आपटे,  माजी क्रिकेटपटू