फॉर्म्युला-वन.. वेगाशी शर्यत करणाऱ्यांसाठी जणू पर्वणीच.. गती, अचूकता आणि प्रसंगावधान राखण्याची तत्परता या बाबतीत शर्यतपटूंची कसोटी पाहणारी शर्यत म्हणून फॉम्र्युला-वनकडे पाहिले जाते. शर्यतीच्या कोणत्या टप्प्यावर मृत्यूची गाठ पडेल, याचे उत्तर एकाही शर्यतपटूकडे नसते. त्यामुळेच ही शर्यत जितकी आकर्षक, चित्तथरारक वाटते, दिसते तितकीच ती जीवघेणीही आहे. अशा अनेक शर्यतींमधील अनेक शर्यतपटूंचा इतिहास आपल्यासमोर आहे. १९५० मध्ये सुरू झालेल्या या शर्यतीत आजवर अनेक शर्यतपटूंनी आपले प्राण गमावले आहेत. अपघात टाळण्यासाठी आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी शर्यतीत अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. त्यामुळेच शर्यतपटू दगावण्याची संख्या कमी झाली, परंतु ती पूर्णपणे संपुष्टात आली, असे म्हणणे धाडसी विधान होईल. १९९४ मध्ये ब्राझीलचा शर्यतपटू आयर्टन सेन्नाच्या अपघाती निधनानंतर फॉम्र्युला-वनमध्ये आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले, परंतु त्यात कुणी दगावले नाही. मात्र, २०१४ मध्ये जापनीज ग्रां. प्री. शर्यतीत झालेला अपघात फॉम्र्युला-वन शर्यतीतील भविष्यातील नायकाचा अस्त करणारा ठरला. फ्रान्सचा शर्यतपटू ज्युल्स बियांची त्या अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि कोमात गेला होता. गेली नऊ महिने मृत्यूशी चाललेल्या शर्यतीत बियांचीला गेल्या आठवडय़ात पराभव पत्करावा लागला. बियांचीच्या मृत्यूने या शर्यतींमधील जीवघेणी स्पर्धा पुन्हा अधोरेखित झाली इतकेच. याहून अधिक या अपघातात आपण भविष्यातील नायक गमावला, अशी खंत वारंवार होणार आहे. मनमिळाऊ, जिद्दी, मेहनती आणि विशेष म्हणजे चेहऱ्यावर नेहमी हास्य, अशी ज्युल्सची प्रतिमा सर्वाच्या मनात कायमची घर करून राहणार आहे. लुईस हॅमिल्टन, निको रोसबर्ग, सॅबेस्टियन व्हेटेल, आदी दिग्गज शर्यतपटूंच्या मांदियाळीतील ज्युल्स नसला तरी त्याच्याकडे भविष्यातील नायक म्हणून पाहिले जात होते हे नक्की. आता त्याला नायक ठरवणे, हे थोडे धाडसी असले तरी त्याच्या लढाऊ वृत्तीतून त्याच्यात असलेली क्षमता अधोरेखित होत होती. वयाच्या २५व्या वर्षी ज्युल्सचा मृत्यू होणे, ही बाब आणखी वेदनादायक आहे. फॉम्र्युला-वन शर्यतीतील अल्पशा कालावधीत, म्हणजे अगदी तीन-चार वर्षांत ज्युल्सने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. प्रतिस्पर्धीही त्याच्यासाठी ढसाढसा रडले, असा होता ज्युल्स.
घरातच शर्यतीचे ‘बाळकडू’ मिळालेल्या ज्युल्सने तिसऱ्या वर्षांपासून शर्यतीत सहभाग घेतला. त्याचे आजोबा माउरो हे जीटी शर्यतपटू होते, तर चुलत आजोबा ल्युसिएन हेही फॉम्र्युला-वन शर्यतपटू होते. त्यामुळे ज्युल्सलाही वेगाच्या थराराची ओढ लागणे साहजिकच होते. त्याची ही आवड जपण्यासाठी त्याच्या वडिलांनी कार्टिग ट्रॅक विकत घेतला. २००७ मध्ये ज्युल्स कार्टिगकडून फॉम्र्युला-वन रेनॉल्ट २.० शर्यतीकडे वळला. ‘रेनॉल्ट २.०’ शर्यत म्हणजे फॉम्र्युला-वन शर्यतीची पहिली पायरी. फॉम्र्युला-थ्री युरो, जीपी २ आणि फॉम्र्युला-रेनॉल्ट ३.५ अशी एक एक पायरी चढून ज्युल्सने २०११ मध्ये फॉम्र्युला वनमध्ये प्रवेश केला. मुळात २००९ मध्ये फेरारी ड्रायव्हर अकादमीने त्याच्यातील नैपुण्य हेरले आणि त्याला पैलू पाडले. २०११ व २०१२ मध्ये सहारा फोर्स इंडिया आणि फेरारी संघाने त्याला राखीव शर्यतपटू म्हणून करारबद्ध केले. या दोन वर्षांत ज्युल्सने शर्यतीतील अनेक बारकावे शिकून, जाणून घेतले आणि स्वत:ला मोठय़ा आव्हानांसाठी तयार केले. २०१३ मध्ये मारुसिआ संघाने त्याला संधी दिली. पहिल्याच सत्रात त्याला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी २०१४ मध्ये त्याने संघासाठी आणि स्वत:साठी पहिल्या विश्व अजिंक्यपदासाठीच्या गुणाची कमाई केली.
या अल्पशा कारकीर्दीत ज्युल्सने एक चांगला माणूस म्हणून आपली प्रतिमा सर्वाच्या मनात बिंबवली होती. संघसहकारीच नव्हे, तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही त्याचा आदर करतात. कार्टिग कारकीर्दीपासून ज्युल्सला ओळखणारे अनेक शर्यतपटू म्हणतात, ‘‘ज्युल्स हा आम्ही आतापर्यंत पाहिलेला कार्टिगमधील सर्वोत्तम शर्यतपटू होता; परंतु दुर्दैवाने फॉम्र्युला-वन शर्यतीत त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळाली नाही.’’ मायकेल शूमाकर हा त्याचा आदर्श. शूमाकरच्या अपघाताची बातमी कळताच ढसाढसा रडणारा ज्युल्स हा तितकाच जिद्दी आणि कठीण प्रसंगांना धर्याने सामोरे जाणारा होता. जापनीज ग्रां. प्री. शर्यतीत अपघातानंतरही त्याने नऊ महिने मृत्यूशी झुंज दिली. त्यामुळे ज्युल्सची कहाणी अधुरी राहिली आहे.
swadesh.ghanekar@expressindia.com