करोना साथीने एकीकडे संपूर्ण भारतभर थैमान घातलेले असताना संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाचे यशस्वी आयोजन करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तब्बल चार हजार कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.

दरवर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात ‘आयपीएल’च्या मनोरंजनाचा हंगाम बहरतो. परंतु यंदा करोनामुळे त्यादरम्यानच्या काळात भारतामध्ये ‘आयपीएल’चे आयोजन करणे ‘बीसीसीआय’ला शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना चार हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता होती. परंतु सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील ‘बीसीसीआय’ने हे शिवधनुष्य पेलत अखेरीस अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान ‘आयपीएल’चे यशस्वी आयोजन करून दाखवले.

‘‘गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के कमी खर्चात ‘आयपीएल’चे आयोजन करूनही ‘बीसीसीआय’ने चार हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. यंदाच्या हंगामात प्रेक्षकसंख्येचा आलेखही उंचावला. त्याशिवाय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिलाच सामना सर्वाधिक प्रेक्षकांद्वारे पाहिला गेला,’’ असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धुमाळ म्हणाले.

‘‘आयपीएलच्या आयोजनाद्वारे आम्ही स्वत:ला एक प्रकारे सिद्ध केले असून ज्यांनी स्पर्धेचे आयोजन न करण्याचा सल्ला आम्हाला दिला होता, ते स्वत:सुद्धा स्पर्धा संपल्यानंतर आमचे अभिनंदन करण्यासाठी आले. ज्यावेळी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला करोनाची लागण झाली. त्यावेळी आम्हीसुद्धा खेळाडूंच्या आरोग्यसुरक्षेबाबत चिंतेत पडलो होतो. त्यातच चेन्नईच्या खेळाडूंनाही करोना झाल्यावर स्पर्धेवर सावट निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर सर्व खेळाडू, साहाय्यक चमू आणि कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे बजावल्यामुळेच कठीण काळातही ‘आयपीएल’चे आयोजन शक्य झाले,’’ असेही धुमाळ यांनी सांगितले.

‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण २३ टक्के अधिक प्रेक्षकांनी टेलिव्हिजनद्वारे आनंद लुटला. त्यामुळे एकूण तीन कोटी, १५ लाख, ७० हजार प्रेक्षकांची यंदा वाढ झाल्याचे समजते. यंदा महिला आणि युवकांचा समावेश वाढल्याचे स्टार स्पोर्ट्स समूहाने म्हटले होते. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला नमवून या हंगामाचे विजेतेपद मिळवत पाचव्या जेतेपदावर नाव कोरले.

‘बीसीसीआय’चा खर्च

* अमिराती क्रिकेट मंडळाला : १०० कोटी

* संपूर्ण स्पर्धेदरम्यान एकूण ३०,०००हून अधिक करोना चाचण्या

* जवळपास १,५०० जणांच्या दोन महिने निवासाची, आहाराची आणि प्रवासाची व्यवस्था.